महापालिका निवडणूक : सोमवारी होणार आरक्षण सोडत

0
215

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. महापालिकेच्या ८१ प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांत लढत होणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण सोडत सोमवार दि. २१ केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी ११ वा. काढण्यात येणार आहे. याच दिवशी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.

मावळत्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपली आहे. सध्या  कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ८१ प्रभागाचा प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे.

२१ रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे. २३ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत यावर हरकती व सूचना मागवून त्यानंतर अंतिम आरक्षणाची घोषणा होणार आहे. कोणत्या प्रभागावर कोणते आरक्षण असणार याबाबत उत्सुकता असून त्यानुसार उमेदवार ठरणार आहेत. यामुळे मागील काही महिन्यांपासून निवडणुकीसाठी तयारी करीत असलेल्यांची घालमेल वाढली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह इतर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांत लढत होणार आहे. यामुळे या सोडतीकडे इच्छुकांसह प्रमुख पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.