कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून यामध्ये शहरवासीयांनी सहकार्य करावे. तर शहरातील प्रलंबित प्रकल्प, आरोग्य आणि पाणीपुरवठा योजना यावर प्राधान्याने भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. आज (गुरुवार) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनासह विविध विषयांवर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी संवाद साधाला.

आयुक्त डॉ.बलकवडे म्हणाल्या, आचारसंहितेपूर्वी सुरू असलेली कामे पूर्ण होतील. मात्र, नवीन कामे आचारसंहिता संपल्यानंतर होणार असून शहरातील रस्त्यांसह सर्व कामे दर्जात्मक होतील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे संदर्भात शासनाच्या नियमानुसार पहिल्या लाटेतील रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांसंख्या वाढ धरून ऑक्सीजन, व्हेटिंलेटर बेडसह सर्व तयारीसाठी नियोजन सुरू आहे. मात्र, नागरिकांनी दक्ष राहून स्वतःची आणि समाजाची काळजी घ्यावी. तसेच कोल्हापूर शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

कोरोनामुळे महापालिकेतील बायोमेट्रिक मशीन बंद होते. परंतु काही दिवसात ते पुन्हा सुरू करण्यात येणार असून सर्वांना बायोमेट्रिक नोंद करणे सक्तीचे आहे. ज्यांची नोंद नसेल त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. बलकवडे यांनी सांगितले.