कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रशासक पदास मुदतवाढ मिळाली आहे. शासनाच्या वतीने आज (शुक्रवार) आदेश काढण्यात आले आहेत. ही मुदतवाढ महापालिका आगामी निवडणुकीनंतरच्या पहिल्या सभेपर्यंत असणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लांबणीवर पडली आणि राज्य शासनाच्या वतीने ३० एप्रिलपर्यंत प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असताना पुन्हा कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निवडणूक घेणे शक्य नसल्याने  शासनाच्या वतीने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रशासकपदास मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र महापालिका प्रशासनास प्राप्त झाले आहे.