मुंबई विद्यापीठाला विजेतेपद, शिवाजी विद्यापीठास तिसरे स्थान

0
19

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ६ गडी राखून पराभूत केले आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेत तिसरे स्थान प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठाचे विनायक शिंदे मालिकावीर ठरले.

दुपारच्या सत्रात मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात स्पर्धेतील अंतिम सामना रंगला. पुणे विद्यापीठाने २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. पुण्याच्या नितीन प्रसाद यांनी ५४ तर दीपक गजरमल यांनी २१ व विनोद नरके यांनी १९ धावा केल्या. मुंबईच्या संजय भालेराव आणि प्रवीण मुळम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. पुण्याचे हे आव्हान मुंबईच्या संघाने १७.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १४८ धावा करून पार केले. मुंबईकडून अत्ताउल्ला खान यांनी ५२, अनिल घडशी यांनी २३ व मनोहर माने यांनी २१ धावा केल्या. अताउल्ला खान सामनावीर ठरले.

तिसऱ्या क्रमांकासाठी सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात सामना झाला. अत्यंत चुरशीने झालेला हा सामना शिवाजी विद्यापीठाने अवघ्या ५ धावांनी जिंकला आणि स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.

शिवाजी विद्यापीठाने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या. त्यात विनायक शिंदे यांच्या ८५ धावांसह विशाल हिलगे यांनी २० तर विश्वनाथ वरुटे यांनी १६ धावा केल्या. नांदेडच्या राशीद शेख, जयराम हंबर्डे, गोविंद सोनटक्के आणि शैलेश कांबळे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

नांदेड संघाला शिवाजी विद्यापीठाने २० षटकांत सर्व बाद १५६ धावांत गुंडाळले. जयराम हंबर्डे (३६), नरशी कागडा (२३) आणि गोविंद सोनटक्के (२२) यांनी विजयासाठी मोठी झुंज दिली. शिवाजी विद्यापीठाच्या विनायक शिंदे आणि अजय आयरेकर यांनी प्रत्येकी २ तर योगेश दळवी, सिद्धार्थ लोखंडे आणि विश्वनाथ वरुटे यांनी एकेक बळी घेऊन नांदेडला विजयापासून रोखले. विनायक शिंदे सामनावीर ठरले.

कुलगुरू चषक टी-२० स्पर्धेच्या ७ डावांत २ अर्धशतकांसह २५७ धावा करणारा विनायक शिंदे मालिकावीर ठरला. स्पर्धेत त्याने सर्वोच्च ८५ धावा केल्या. गोलंदाजीमध्येही १०.७७ च्या सरासरीने त्याने १३ बळी घेतले. या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तो मालिकावीर ठरला.

स्पर्धेत ७ डावांत २ अर्धशतकांसह सर्वोच्च ९७ धावांची खेळी करीत ३१६ धावा करणारे मुंबई विद्यापीठाचे अनिल घडशी सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मारुती शेवाळे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. त्यांनी ५ डावांत ५.९५ च्या सरासरीने १३ बळी घेतले. गतिमान क्षेत्ररक्षणाच्या बळावर ११ खेळाडूंना बाद करणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या नितीन प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण समारंभास प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राज्य कर्मचारी महासंघाचे महासचिव मिलिंद भोसले, सेवक संघाचे उपाध्यक्ष संजय पवार, सीपीआरचे आरोग्यदूत बंटी सावंत आदी उपस्थित होते.