मनपाच्या ‘या’ परिपत्रकामुळे मुंबईकरांची दिवाळी यंदा शांत, शांतच…

0
81

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हाच कित्ता आता मुंबई महापालिकेनेही गिरवायचा ठरवलं आहे. मुंबई महापालिकेने आज (सोमवार) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईकरांना दिवाळीच्या काळात केवळ लक्ष्मीपूजनादिवशीच सौम्य स्वरूपाचे फटाके वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्य दिवस फटाके फोडण्यावर बंदी असेल, यामुळे यंदा दिवाळीतील बालचमूंच्या, तरुणांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.

परिपत्रकात म्हटले आहे की, १४ नोव्हेंबर २०२० रोजी फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी कोविडविषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.