नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात मुंबईसह १८ महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सत्ताधारी आघाडीत धुसफूस सुरू झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत टीकेची झोड उठवली आहे.

राज ठाकरे यांनीही या त्रिसदस्यीय पद्धतीला जोरदार विरोध केला आहे. ते म्हणाले की, देशात सर्वत्र कोणत्याही निवडणुकीसाठी एक उमेदवार अशी पद्धत असताना येथेच ही अशी प्रभाग पद्धती का? महाराष्ट्रात हे कुठून आणि का सुरू झाले याचे एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे, त्यासाठी आपल्याला हवे तसे प्रभाग तयार करणे आणि मग पैसा ओतून निवडणुका जिंकणे. या सगळ्या गोष्टींचा त्रास लोकांना का? त्यांनी एका उमेदवाराला मतदान करण्याऐवजी तीन-तीन उमेदवारांना मतदान का करायचं? आपल्याला हवे तसे प्रभाग करायचे, हे कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने याबद्दल कृती केली पाहीजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप सत्तेत असताना त्यांनीही बहुसदस्यीय प्रभागपद्धतीच निवडली होती. तर या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही त्यांच्या कार्यकारिणीत मंत्रिमंडळ निर्णयाविरुद्ध ठराव केल्याने सरकारपुढे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.