कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगांव एमआयडीसीच्या आत येणाऱ्या मुख्य प्रवेश रस्त्याजवळ वाईड वील पाईप घेऊन जाणारा मल्टीअॅक्सल ट्रेलर काल (शनिवारी) पहाटे पलटी झाला. यामुळे एमआयडीसीत जाणारी वाहतूक पूर्ण दिवस पर्यायी मार्गाने सुरू होती. संभापूर येथून हा ट्रेलर चित्रदुर्ग (कर्नाटक) कडे जात होता. गोकुळ शिरगांव एमआयडीसी आणि कणेरीकडे जाण्यासाठी महामार्गावरील पुलाला तटण्याची शक्यता असल्याने चालकाने एमआयडीसी सेवा रस्त्यावरून जाणे पसंत केले. यावेळी मागील चाक गटारीत गेल्याने ट्रेलरचा मागचा भाग उलटला. सायंकाळी हा मल्टीअॅक्सल ट्रेलर व्यवस्थित करण्यात आला. त्यामुळे कागलकडे जाणारी वाहतूक दुपारपासून संथगतीने सुरू होती.

गोशिमाचे पदाधिकारी व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी सदर ट्रेलरची पाहणी केली. यापूर्वी एमआयडीसी मध्ये येणार कंटेनर, ट्रक हे लहान अॅक्सलचे होते. त्यामुळे सदर प्रवेश रस्ता योग्य होता. मात्र सध्या औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे ट्रेलर हे मल्टीअॅक्सल आहेत आणि वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील प्रवेश रस्ता हा मल्टीअॅक्सल ट्रेलरना वळण घेतेवेळी अपुरा पडत आहेत.

याचा विचार करून गोशिमाच्या वतीने गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीमध्ये प्रवेश करणारे मुख्य प्रवेश रस्ता मोठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना वेळोवेळी गोशिमाच्या वतीने पाठपुरावा केलेला आहे. तसेच सध्या पुन्हा एकदा प्रस्ताव पाठविला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने लवकरात लवकर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रवेश करणारा मुख्य प्रवेश रस्ता मोठा करण्यात यावा, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.