मुख्तार नकवी यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

0
11

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न दिल्याने मुख्तार अब्बास नकवी यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागेल, अशी चर्चा सुरू झाली होती. नकवी यांनी आज (बुधवारी) अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे. नकवी यांचे नाव भाजपकडून उपराष्ट्रपती किंवा राज्यपालपदासाठी पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यात नकवी यांच्याबरोबर जदयूच्या कोट्यातील आरसीपी सिंह यांचाही समावेश आहे. नकवी हे २०१० पासून २०१६ पर्यंत उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे सदस्य होते. २०१६ मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. मुख्तार नकवी यांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. पहिल्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.

वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मुख्तार नकवी हे माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री होते. २६ मे २०१४ रोजी मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग आणि संसदीय कामकाज खात्याची राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. १२ जुलै २०१६ मध्ये नजमा हेपतुल्ला यांच्या राजीनाम्यानंतर नकवी यांना अल्पसंख्याक मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला होता. ३० मे २०१९ रोजी त्यांना पुन्हा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. सध्या राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या खासदारांच्या सात जागा रिक्त आहेत. या सात जागांसाठी कुणाची निवड केली जाणार हेही महत्त्वाचे असणार आहे.