महावितरणच्या कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी : खोल दरीत उभारली वीजवाहिनी

0
6

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा गडावरील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रातून नावली व मिठारवाडी या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या ११ के.व्ही. वीजवाहिन्या अतिवृष्टीने झालेल्या भुस्सखलनामुळे जमीनदोस्त झाल्या होत्या. पन्हाळगडाच्या दऱ्या-खोऱ्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून उंच कड्यावर वीजखांबांची वाहतूक करून १ हजार फूट खोल दरीतून वीजवाहिन्या उभारण्याचे काम तडीस नेले. 

नावली गावठाण, मिठारवाडी गावठाण आणि मिठारवाडी शेतीपंप या तीन वाहिन्यांचे वीजखांब व वीजतारा अतिवृष्टी आणि  भूस्सखलनामुळे वाहून गेल्या होत्या. या वाहिन्यांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात केर्ले व सातवे या उपकेंद्रातून सुरु केला होता.

पन्हाळा गडावरील भौगोलिक परिस्थिती, जागेची उपलब्धता, धुके व पावसामुळे पन्हाळा उपकेंद्रातून निघणाऱ्या बाधित वीजवाहिन्यांची उभारणी करणे जिकीरीचे काम होते. खचलेला रस्ता, नागमोडी वळणाच्या पायवाटा, खडाचढ व पाऊस-वारा अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ५०० किलो वजनाचा एक वीजखांब असे ५ वीज खांब व वीजतारांची वाहतूक केली. उंच कड्यावरील व दरीतील वीज खांब उभारुन वीज वाहिन्या ओढण्याचे काम पूर्ण केले.

त्याआधी अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी स्वत: स्थळ पाहणी करुन सदर कामाचे नियोजन केले. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपकार्यकारी अभियंता अमोल राजे, सहाय्यक अभियंता सुलतान शेळके, कनिष्ठ अभियंता प्रविण पाटील, मुख्य तंत्रज्ञ  वडांबे व जनमित्रांनी ही कामगिरी पार पाडली. सदर कामासाठी पन्हाळा नगरपरिषदेचे मोलाचे सहकार्य लाभले.