पुणे (प्रतिनिधी) : राज्यात वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा एमपीएससीकडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहीर केला. राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असे या पत्रकामध्ये म्हटले आहे. दरम्यान, परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून सरकारविरोधात संताप व्यक्त केला.  

१४ मार्च रोजी एमपीएससीची पूर्वपरीक्षा होणार होती. त्यासाठी सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्र देखील दिले होते. आता परीक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी कोरोना नव्हता का? राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या त्यावेळी कोरोना नव्हता का? असा  संतप्त सवाल करून विद्यार्थ्यांनी सरकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.  विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. पण विद्यार्थी मागे हटायला तयार नव्हते.