कोल्हापूर (प्रतिनिधी) : एमपीएससीच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहीर केला. या निर्णयाविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आज (गुरूवार) ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद कोल्हापुरातही उमटले. जिल्ह्यातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सायबर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी बाजूला हटण्यास नकार दिला. आंदोलनस्थळी मोठा पोलीस फाटा दाखल झाला आहे.    

दरम्यान, १४ मार्च रोजी एमपीएससीची पूर्वपरीक्षा होणार होती. त्यासाठी सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्र देखील दिले होते. आता परीक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी कोरोना नव्हता का? राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या त्यावेळी कोरोना नव्हता का? असा  संतप्त सवाल करून विद्यार्थ्यांनी सरकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.