सातारा (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आता मराठा समाजाला भूलथापा देणे बंद करावे. केंद्राकडे बोट न दाखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रत्यक्ष कृती सुरू करावी, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक कोणीही रोखू शकणार नाही, अशा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. या संदर्भात उदयनराजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

उदयनराजे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटना दुरुस्तीचे दाखला देत, राज्य सरकारला एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार नाही असा निकाल दिला होता. त्यामुळे गेली तीन महिने राज्य सरकार आरक्षणाची जबाबदारी केंद्र शासनावर ढकलून देत ‘टाईमपास’ करत होते का? मात्र आता केंद्राने १२७ वी घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून राज्याला पुन्हा अधिकार बहाल केले आहेत. त्यासंबधीचा कायदा राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी पाठविला असून लवकरच त्याला मंजूरी मिळून कायदा अस्तित्वात येईल. या घटनादुरूस्तीमुळे राज्य सरकारला एखाद्या समाजाला सामाजिक न शैक्षणिक मागास ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला भूलथापा देणे बंद करावे. केंद्र सरकारने जे घटनादुरूस्ती विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मार्गातला एक अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर मराठा आरक्षण मिळू शकते. मात्र आता ५० टक्के मर्यादेवर बोट ठेवत परत केंद्रावरच जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. परंतु आरक्षण मर्यादा जरी वाढली तरी सुद्धा जोपर्यंत मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, हे सरकारने आता लक्षात घ्यावे. राज्य सरकारने कृतीतून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक कोणीही रोखू शकणार नाही.