‘गोकुळ’च्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करू : खा. शरद पवार  

0
48

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ आणखी बहरत जावो, संघ अजून मला बहरलेला पहायचा आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या उन्नतीचे नवनवीन पाऊल संघाने टाकावे अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच पुढील काळात संघास मार्गदर्शनाची गरज लागल्यास सर्वतोपरी मदत करु, असे आश्‍वासन दिले. संघाचे चेअरमन विश्वास पाटील आणि नूतन संचालकांनी पवार यांची आज (बुधवार) मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या वेळी दूध संघाच्या विविध विषयावर शरद पवार व विश्‍वास पाटील (आबाजी), ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्यात चर्चा झाली. या वेळी पवार यांनी संघाच्या उत्कृष्ट कामकाजाबाबत गौरवोद्गार काढले. गोकुळने ग्रामीण भागाची आर्थिक उन्नती चांगल्या प्रकारे केलेली आहे. पारंपरिक दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप देऊन  गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटित स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. याचा राज्यातील इतरांनी आदर्श घ्यावा असेही खासदार शरद पवार यांनी नमूद केले.

या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, संचालक  बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, मुंबई शाखेचे शाखाप्रमुख दयानंद पाटील उपस्थित होते.