कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासंबंधित कोणत्याही प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होत असताना, त्या पुस्तकातील मजकूर विद्यापीठाकडून तपासून घेण्यात यावा, अशी सूचना खा. संभाजीराजे यांनी मांडली. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांस अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले आहेत. विद्यार्थ्यांपुढे चुकीचा इतिहास मांडला जाऊ नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बी. ए. व एम. ए. इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमात महाराणी ताराबाई राणीसाहेब, कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई साहेब, क्रांतिवीर छ. चिमासाहेब महाराज तसेच करवीर राज्याचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ इतिहाससंशोधक जयसिंगराव पवार यांनी केली.

वेगवेगळ्या प्रकाशनांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांना अधिकृतपणे प्रमाणित करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने तज्ञ समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीकडून प्रमाणित झाल्यानंतरच प्रकाशकांना पाठ्यपुस्तक वितरीत करता येईल, असे सांगत विद्यापीठाचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्याबाबत  कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या बैठकीस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास विभागप्रमुख अवनीश पाटील यांचेसह इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, राम यादव व राहुल शिंदे उपस्थित होते.