कोल्हापूर  (प्रतिनिधी) : हातकणंगले-इचलकरंजी या दरम्यान आठ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर या रेल्वे मार्गाचे काम सुरु करावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचेकडे निवेदनाव्दारे केली.

रेल्वेमार्गाला २०१७ साली मंजुरी मिळाली आहे. यासाठी दहा कोटी रुपयांची  तरतूद करण्यात आली होती. याच बरोबर जून २०१७ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजनही संपन्न झालेले होते. तसेच २०१८ साली या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सेंट्रल रेल्वे, पुणे यांच्यावतीने पूर्ण केले असून याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेली आहे.

दोन वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये एप्रिलमध्ये दहा हजार व जूनच्या अर्थसंकल्पामध्ये दहा लाख रुपये आर्थिक तरतूद करण्यात आलेली होती.परंतु यानंतर आवश्यक ती तरतूद करण्यात आलेली नाही. तरी या रेल्वेमार्गासाठी तत्परतेने आर्थिक तरतूद करून सदर रेल्वे मार्ग तत्परतेने पूर्ण करून इचलकरंजीतील वस्त्र उद्योगाच्या वाढीसाठी आणि उद्योगाच्या विकासासाठी व वाहतुकीसाठी रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती खासदार धैर्यशील माने व खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी  रेल्वेमंत्री गोयल यांचेकडे केली.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी निवेदन दिल्यानंतर माझी व खासदार मंडलिक यांची सविस्तर चर्चा साली. या संदर्भात योग्य निर्णय घेऊ व या रेल्वे मार्गाला आर्थिक तरतूद करणेसाठी जरूर प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे इचलकरंजीला रेल्वे सेवा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे खा. माने यांनी सांगितले.