Published May 29, 2023

मुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये फेरबदल होऊ शकतात. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री सतेज पाटील आणि प्रदेश माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यामध्ये अशोक चव्हाण यांचे पारडे जड मानले जात आहे.

अशोक चव्हाण मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले होते. तसेच यापूर्वीही त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते काँग्रेसमधील जनाधार असलेले सर्वात मोठे नेते मानले जातात.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांच्यासह एक शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडला भेटले. काँग्रेसला जर राज्यात वाचवायचे असेल, तर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी हायकमांडकडे केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वृत्त फेटाळून लावले. आपण दिल्लीला गेलो होतो, मात्र ती सदिच्छा भेट होती असे त्यांनी म्हटले.

प्रदेशाध्यक्ष हे पक्षाचे राज्यातील सर्वोच्च पद असते. त्यामुळे त्याबाबत आपल्याला बोलायचे नाही; मात्र एवढे नक्की की सर्वांनी मिळून मिसळून काम केले तर पक्षाची कामगिरी अधिक चांगली होईल, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी पटोलेंचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023