इचलकरंजी (प्रतिनिधी) : वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नागरिकांना केळी व लाडू वाटप करुन केंद्र सरकारविरोधात गांधीगिरी पध्दतीने आज (शनिवार) सोन्या मारुती मंदिर परिसरातील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

नागरिकांना केळी व लाडू वाटप करुन गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी, महिलांच्या उपस्थितीत केळी व लाडूची शिदोरी वाद्याच्या गजरात सोन्या मारुती मंदिरानजीकच्या पेट्रोल पंपावर आणण्यात आली. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर व पेट्रोलच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केल्याने  महागाई गगनाला भिडली आहे. या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ही वाढती महागाई कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आवळे यांनी यावेळी केली.

या आंदोलनात दाविद कांबळे, भारत कांबळे, राजाक्का कांबळे, वंदना शिंदे, छबू आवळे, मीना शिंदे, सरला शिंदे, हर्षल म्हाकवे यांच्यासह बालचमू सहभागी झाला होता.