पन्हाळा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात डोंगराला आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. मागील आठवड्यात सादळे-मादळे डोंगराला आग लागून दुर्मिळ वनसंपदा नष्ट झाली होती. आज (बुधवार) सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार, इंजोळे, पन्हाळा परिसरात आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ही आग काही क्षणात चांगलीच भडकली. यामध्ये जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून डोंगराला आगी लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने ही आग कोणी मुद्दामहून लावत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.