हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना कराड (जि. सातारा) येथून २०१८ साली चोरीस गेलेली मोटरसायकल हातकणंगले पोलिसांनी एसटी स्टँडसमोर पकडली. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी हंबीरराव शेळके (वय वर्ष ३२, रा. तारदाळ रोड हातकणंगले) याला पोलिसांनी पकडले आहे. तसेच याला कराड पोलिसांच्या ताब्यात दिले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस वाहतूक नियमन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गस्त घालीत होते. यावेळी नंबर प्लेट नसलेली एक मोटारसायकल थांबवली. त्याचा नंबर एमएच – ११ एक्यू ११३३ असल्याचे संशयित शिवाजी हंबीरराव शेळके याने सांगितले. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली. तसेच ई चलन मशीनवर नंबर टाकला असता सदरची मोटरसायकल नरेंद्र पटेल (रा. बुधवार पेठ, कराड) यांची असल्याचे निदर्शनास आले.

पोलीसांनी तात्काळ कराड पोलीस स्टेशनकडे चौकशी केली असता २०१८ साली मोटरसायकल चोरीस गेले असल्याचा गुन्हा नोंद असल्याचे सांगण्यात आले. यावरून मोटरसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. हा गुन्हा पो.नि. अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम, प्रकाश लाड, होमगार्ड मुजावर, नरुटे यांनी उघडकीस आणला. पुढील तपास कराड पोलीस करीत आहेत.