इस्पूर्ली येथे ट्रॉलीला मोटारसायकल धडकली : चिरमुरे विक्रेता जागीच ठार   

0
652

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  कोल्हापूर कळंबा येथून चिरमुरे विकून घरी जात असताना उसाने भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रॉलीला मोटार सायकलची धडक बसून झालेल्या अपघातात निगवे खा (ता. करवीर) गावचे सुभाष काणेकर (वय ५९) जागीच ठार झाले. हा अपघात इस्पूर्ली येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री ७ वाजता झाला.

सुभाष काणेकर यांचा चिरमुरे विकण्याचा व्यवसाय असून ते नेहमीप्रमाणे चिरमुरे विकण्यासाठी मोटारसायकल (MH 09 AV 8583 ) ने कळंबा येथे गेले होते. चिरमुरे विकून गावी निघाले असता मोटारसायकल  ट्रॉलीला धडकल्याने ते रस्त्यावर जोरात आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  या अपघाताचे दृश्य अंगावर शहारा आणणारे होते. सुभाष काणेकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त समजताच गावात  शोककळा  पसरली.  पत्नीने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.

अपघाताचे वृत्त समजताच इस्पूर्ली पोलीस ठाण्याचे एएसआय  ए.ए.खडके  व  पी. पी. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.