दिल्ली (वृतसंस्था) : ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०२१ ते जून २०२२ पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून ही माहिती मिळाली आहे. इतर देशांतून ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांतून ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे. या काळात युरोपबाहेरून येणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्यांनी या आकडेवारीवर एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहेत.

स्थलांतरितांच्या संख्येत विक्रमी वाढ होण्यामागे कोविड नियमांमध्ये दिलेली शिथिलता असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत ब्रिटनमध्ये परदेशातून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या ही भारतातील असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. यापूर्वी चीनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसामध्ये २७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.