कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग आरक्षणावर एकूण ६० हरकती दाखल झाल्या आहेत. आज (मंगळवार) शेवटच्या दिवशी सर्वाधिक म्हणजे तब्बल ३१ हरकती घेण्यात आल्या आहेत. यावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुनावणी घेण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावर हरकती घेण्यासाठी आजअखेर (४ जानेवारी) मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ६० हरकती आल्या आहेत. त्यापैकी आज शेवटच्या दिवशी ३१ हरकती घेण्यात आल्या. आता आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसमोर या हरकतींवर सुनावणी होणार आहे. १० जानेवारीपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात होईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सुनावणीवेळी हरकतीमध्ये तथ्य असल्याचे समोर आल्यास संबंधित प्रभागाचे फेरआरक्षण निघू शकते.