कोल्हापूर (प्रतिनिधी) :  २०१९ पासून रखडलेली पोलीस व तलाठी भरती लवकरात लवकर व्हावी. तसेच येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद परीक्षांची तारीख जाहीर करावी. या मागणीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सौरभ शेट्टी यांनी दिले.

यावेळी सौरभ शेट्टी म्हणाले की, सरळसेवा परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि त्याचे पुरावे ही आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या नियंत्रणाखाली व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सरळसेवेच्या परीक्षा घेतले जाणे गरजेचे आहे. खाजगी कंपन्या भ्रष्टाचार करून सुध्दा आयटी खात्याचे मंत्री बंटी पाटील शांत का ? असा सवाल उपस्थित केला. मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन उभे करू, असा इशारा यावेळी दिला.

यावेळी सुनिल दळवी, विश्वंभर भोपळे, ऋषी गायकवाड, अक्षय खोत,  सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आणि एमपीएससी समन्वय समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.