मराठा आरक्षणासाठी शिरोलीत सर्वपक्षीयांचा मोर्चा

0
53

टोप (प्रतिनिधी) : मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिरोली येथे आज (सोमवार) सर्वपक्षीयांनी शिरोलीत मोर्चा काढला. शिरोली फाट्यापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा काढून सरपंच शशिकांत खवरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाने आजपर्यंत कोणत्याही ओबीसी व इतर कोणत्याही आरक्षणास विरोध केला नाही. सर्व समाजाच्या आरक्षणास पाठिंबा दिला. मराठा समाज पूर्वीपासूनचा  पासून शेतीवर अवलंबून होता, मात्र मागील तीस ते चाळीस वर्षांपासून तोट्यात गेलेली शेती व शेतीचा भावा-भावांत झालेली विभागणी यामुळे मराठा समाज मागास होत गेला. त्याचा सामाजिक व शैक्षणिक स्तर घसरत गेला. त्यामुळेच आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाजाने शांततेने ऐतिहासिक मोर्चे काढले. युती सरकारने मागास आयोग नेमून सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून मराठ्यांना आरक्षण दिले.

मात्र आमचा मराठा समाजास पाठिंबा आहे म्हणायचे व आरक्षणाविरोधात न्यायालयात वेगवेगळी याचिका दाखल करावयाच्या अशा दुतोंडी भूमिका काही जण घेत आहेत. सध्या एमपीएससी परीक्षा होत आहेत तसेच ११ वी प्रवेश,  प्रवेश परीक्षा, भरती सुरू होणार आहे. मराठा आरक्षणामुळे मराठा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे, त्यांना आरक्षण मिळाले नाही त्यांचे भविष्य अंधकारमय होणार आहे. न्यायालयीन निकाल कधी लागेल तो लागेल, पण या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व नोकरीतील आरक्षणासंदर्भात शासनाने त्वरित न्यायालयात टिकणारा वटहुकूम काढावा. आमच्या मागणीचा ग्रामपंचायतीतर्फे तर्फ ठराव करून तो शासनाकडे कळवावा ज्यायोगे न्यायालयीन लढाईत सरकारच्या उपयोगी पडेल ही विनंती असे निवेदन खवरे याना देण्यात आले.

या वेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेश पाटील, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, दीपक यादव माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, जोतिराम पोर्लेकर, डॉ. सुभाष पाटील, सतीश पाटील, पिंटू करपे आदींसह नागरिक उपस्थित होते.