इचलकरंजीत वाहतूक सेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा…

0
63

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीच्या विरोधात वाहतूक सेनेतर्फे चारचाकी वाहन ओढत इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इंधन दरवाढ मागे घेऊन वाहतूक व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवसाय पूर्णपणे बंद होता. सध्या हा व्यवसाय पूर्वपदावर येत असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज भागविणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे मुश्कील होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून या व्यवसायाला दिलासा द्यावा.

तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक सुरू आहे. पण महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहतुकीला बंदी घातली आहे ती काढावी.  त्याचबरोबर कोविडच्या काळातील प्रवासी कर माफ करावे, अशी मागणी  वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी इंधन दरवाढ कमी न झाल्यास वाहन आणि त्यांच्या कुटुंबासहीत प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

या मोर्चात शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष विजय देवकर, निलेश परदेशी, मेहबूब पठाण, इम्रान सनदी, सचिन खोंद्रे यांच्यासह वाहनधारक सहभागी झाले होते.