कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरून  अॅक्टीव्हा मोपेडची चोरी करणाऱ्या चोरट्याला उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर च्या पथकाने अटक केली. रामचंद्र निवृत्ती पोवार (वय ४० रा. जय बजरंग तालीम मंडळ, वळीवडे ता. करवीर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून (MH-09-EE-2942) मोपेड अॅक्टीव्हा जप्त केली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गांधीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरून ३० ऑगस्ट २०२१ रोजी विमलकुमार पमनामी यांची अॅक्टिव्हा मोपेड चोरीस गेली होती. त्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने गांधीनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अॅक्टीव्हा मोपेडची चोरी करणारा चोरटा वळीवडे गावात राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वळीवडे गावातून रामचंद्र पोवार यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरूवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखवतच त्याने चोरलेली मोपेड गांधीनगर ग्रामपंचायत येथील पाण्याचे टाकीसमोर लावल्याची कबुली दिली.

ही कारवाई करवीरचे डीवायएसपी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राम माळी, सुजय दावणे, सुनिल कुंभार, विजयकुमार शिंदे, सुनिल माळी, रोहित कदम यांनी केली.