गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोना काळात सुट्टीवर गावी आलेल्या सीमा पोलिसाकडून ‘होम क्वारंटाइन’ वरून झालेल्या वादातून ‘अॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत १ लाख १० हजार रुपये लाटल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. यामध्ये हसुरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील तत्कालीन सरपंच संजय कांबळे, दशरथ वाघराळकर आणि श्रीकांत जाधव यांचा समावेश आहे. अंकुश गोरे यांनी या तिघांविरोधात गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे हे भारत तिबेट सीमा पोलीस दलात उत्तराखंड येथे नोकरीस असून ते ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या मूळ गावी हसुरवाडी येथे आले होते. त्यावेळी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने कोव्हीड सेंटरमध्ये स्वॅब तपासणीनंतर गोरे यांना १३ दिवस ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले. पण नंतर त्यांना समजले की गावातील कांही लोकांना मात्र हा कालावधी पूर्ण न करताच मुक्त करण्यात आले होते. त्याबाबत त्यांनी वाघराळकर यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.

नंतर वरील तिघांनी वाद मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे दिड लाख रुपयांची मागणी केली अन्यथा अस्ट्रॉसीटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच गोरे यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. गोरे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक हारुगडे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.