कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडम मधील ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ’   आणि ‘ओरवो स्टुडिओ’ ने ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण केले आहे. चित्रिकरण आणि तांत्रिक बाबी  लंडनमध्येच होणार  असून  हा चित्रपट मराठी, इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे. उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असणाऱ्या या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

छत्रपती ताराराणी यांनी जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही,  डच,  इंग्रज,  पोर्तुगीज,  सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित चित्रपट २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चरित्रग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आहे. संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. औरंगजेबसारख्या क्रूर आणि निष्ठूर राज्यकर्त्याला यमसदनी पाठवणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

या चित्रपटाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले की,   छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा असूनही छत्रपती ताराराणींबद्दल लोकांना इतकी माहिती नाही. त्यांचे धाडस आणि शौर्य असामान्य आहे. त्यांची ही वीरगाथा लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.