कोल्हापूर (विजय पोवार) : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा म्हणजे शरद पवार. राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी त्यांच्याशिवाय केवळ अशक्य. असे असले तरी शरद पवार यांनी आज (शनिवार) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि तब्बल एक तास चर्चा केली. राज्याच्या दृष्टीने ही आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची घटना. अर्थातच या भेटीची चर्चा तर होणारच. या चर्चेच्या निमित्ताने दिवसभर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कही काढले गेले. 

याबाबत काही राजकीय लोकांनी खुलासे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार शरद पवार यांची भेट नियोजित होती हे सर्वांना या भेटीनंतर कळले. पण शरद पवार यांनी गेल्या महिन्यात तिसऱ्या आघाडीसाठी केलेले प्रयत्न. यासाठी काँग्रेस-भाजप वगळून देशपातळीवरील नेत्यांची आपल्या निवासस्थानी  घेतलेली बैठक. याच बरोबर राज्यातील महाविकास आघाडीतील. नेते शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. याच वेळी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची झालेली स्वतंत्र बैठक हा चर्चेचा विषय झाला होता.

मागील दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याही बैठका झाल्या होत्या. यावरून अलीकडे शरद पवार आजारपणातून उठल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात फारच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आजच्या पवार-मोदी भेटीबाबतच्या चर्चेत सुरुवातीला आश्चर्य अधिक होते. त्याबाबत अजून तरी स्वतः शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. पण काही राजकीय नेत्यांनी मात्र आपापल्या परीने खुलासे करून लोकांच्यातील संभ्रम दूर करण्याचा लटका प्रयत्न केला आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलेल्या चर्चेत महाराष्ट्राच्या हिताच्या निश्चितच चर्चा झाल्या असतील. पण केंद्रातून महाराष्ट्रात ज्या काही प्रत्यक्ष कारवाया होतात त्याचा विशिष्ट व्यक्तीवर होणारा परिणाम यावर चर्चा झालीच नसेल असे म्हणता येईल का,  हा प्रश्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या भेटीबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करताना या भेटीबद्दल कोणीही संशय व्यक्त करू नये असे आवाहन केले. या भेटीत सहकारी बँकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध यावर चर्चा झाल्याचे सांगितले. आणि भेटीबद्दल गैरसमज पसरवणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आणि पवार-मोदी भेट पूर्वी पवार-फडणवीस भेट झाल्याचा इन्कारही त्यांनी केला. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या विचारात नदीच्या दोन टोकाचे अंतर असून ते एकत्र येणे केवळ अशक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी आपल्या स्टाईलने या भेटीबाबत आपले मत मांडले. यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे असे म्हणत त्यांनी शरद पवार यांनी संरक्षण, कृषी, सहकार क्षेत्राशी संबंधित चर्चा केल्याचेही सांगून टाकले. याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची गरज होती असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. पण सहकारी बँकेवरील निर्बंध यावर चर्चा झाल्याचे सांगून ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले.

खुद्द शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींची एक तास चर्चा झाल्यानंतरही केंद्रातील नव्या सहकार मंत्रालय बाबत चिंता व्यक्त करणारे पत्र देऊन ते प्रसिद्धीस दिले. यामुळे राज्यात केंद्रातील भूमिकेबद्दल अस्वस्थता असताना शरद पवार यांच्यासारख्या जाणकार नेत्याने एका तासाच्या भेटीत जुजबी चर्चा केली असावी, हे गेली अनेक वर्षे शरद पवारांचे राजकारण अनुभवणाऱ्याना कसे पटेल?  त्यासाठी स्वतः शरद पवार यथावकाश स्पष्टीकरण देतीलही तरीही या भेटीची चर्चा तर होणारच…