नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांना आज (मंगळवार) निरोप देण्यात आला. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.   

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांचा उल्लेख करताना मोदी यांनी  अनेक गोष्टींना उजाळा दिला . ते म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना गुलाम नबी आझाद यांनी मला त्यादिवशी फोन केला. सर्वांच्या आधी मला गुलाम नबी यांचा फोन आला. तो फोन केवळ सूचना देण्यासाठी नव्हता. त्यावेळी त्यांना फोनवरही रडू आवरणे कठीण झाले होते’,  असे सांगताना मोदींना अश्रू अनावर झाले.  गुलाम नबी आझाद यांच्याशी माझे नेहमीच मैत्रीचे संबंध राहिले आहेत. राजकारणात चर्चा,  आरोप-प्रत्यारोप होतच राहतात. परंतु  एक सच्चा मित्र म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो,  असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.