कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाने दिनांक २१ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणाऱ्या अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप आणि संगणक प्रणाली समजावी, याकरिता मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

सदरची मॉक टेस्ट ही संगणक प्रणालीतील सर्व बाबी समजण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली आहे. मॉक टेस्ट ही विषयनिहाय नसून सामान्यज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमांचा प्रणालीत समावेश आहे. दिनांक १६ व १७ ऑक्टोबर २०२० या दोन दिवसांत एकूण ५० हजार ५२७ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ३९३ इतक्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मॉक टेस्ट यशस्वीपणे सोडविली आहे. उर्वरितपैकी अनेक विद्यार्थ्यांना मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच ठिकाणी मोबाइलचे नेटवर्क आणि विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यामुळे मॉक टेस्टची लिंक, लॉगीन आय.डी. प्राप्त होण्यात अडचणी उद्भवल्या आहेत. ही नैसगिक आपत्ती विचारात घेता जे विद्यार्थी अद्याप परीक्षा देऊ शकलेले नाहीत, त्यांच्यासाठी विद्यापीठामार्फत पुनःश्च एकदा लिंक पुरविण्यात येणार आहे. सदरच्या विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट देऊन सदरच्या ऑनलाईन परीक्षेसाठी तयार केलेल्या संगणक प्रणालीविषयी सर्व बाबी माहिती करुन घ्यावी, जेणे करून अंतिम सत्राची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही.

विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या त्रुटी त्याच बरोबर अन्य काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याच्या निराकरणासाठी कॉल सेंटरमार्फत ३० हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्यांची माहिती स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्याच बरोबर विद्यापीठाकडून helpline@unishivaji.ac.in  या इमेलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी अथवा त्रुटी सादर करण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.