टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) हे पुणे – बेंगलोर महामार्गावर वसलेले गाव. जवळच असलेल्या शिरोली एम.आय.डी. सी मुळे जिल्ह्यातील कित्येक गावातून शेकडो लोक शिरोली व टोप या ठिकाणी आठवडा बाजारासाठी येत असतात. टोप येथील आठवडा बाजारात मोबाईल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दर गुरुवारी भरणाऱ्या या बाजारात किमान चार ते पाच मोबाईल चोरीला जात असल्याने शेतकरी, विक्रेते, नागरिक अत्यंत त्रस्त झाले असून या चोरट्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी होत आहे. 

टोप येथील आठवडा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे शेतकरी – व्यापारी तसेच टोप परिसरातील नागरिक, एम.आय.डी.सी मधील कामगारांची या बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. याचाच फायदा मोबाईल चोरटे घेत असून प्रत्येक गुरुवारी भरणाऱ्या या बाजारातून आजवर ५० हून अधिक मोबाईल चोरीला गेले आहेत.

दर गुरुवारी किमान तीन ते चार महागडे मोबाईल चोरीला जात आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी काही मोबाईल चोरटे सापडले होते. त्यावेळी त्यांना लोकांनी चांगलाच चोप दिला होता  पण ते अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन सोडण्यात आले होते. पण पुन्हा मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे नागरिक वैतागले असून या चोरांना त्वरित पकडावे, अशी मागणी होत आहे.