मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोरोना चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण केले. भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोरोना चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल ‘स्पाईस हेल्थ’ला धन्यवाद दिले.

एनएबीएल ॲक्रिडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोरोना चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सरकारने काही दिवसांमध्ये ५०० वर कोरोना चाचणी केंद्र नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशयितांची तपासणी करताना सहव्याधीग्रस्तांचा शोध घेण्यात आला. कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येताना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे.