विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली करू नये, अन्यथा… : मनसेचा इशारा

0
79

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाची साथ कमी झाल्यावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आल्यावर सरकारने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. परिणामी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगल्या प्रमाणात सुरू झाली. मात्र शाळा सुरू होऊन काही दिवस होतात तोपर्यंत संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांकडे फी वसुलीसाठी तगादा सुरु केला. फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना अपमानास्पद बोलणे, शारीरिक शिक्षा करणे अशी वागणूक देण्यात येत आहे. न्यायालयाच्या सक्तीची फी वसुली करू नये या सूचनेला हरताळ फासण्याचे काम संस्थाचालकांनी केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सक्तीने फी वसुली करू नये, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी दिला आहे.

मनसेतर्फे आज (शुक्रवार) गटशिक्षणाधिकारी यांच्या नावे देण्यात आलेले निवेदन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कोरवी यांनी स्वीकारले.