इचलकरंजी (प्रतिनिधी) : आधीच कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना जगणे कठीण होऊन बसले आहे. असे असताना महावितरणने वीज बील माफी किंवा बिलामध्ये हप्ते देण्याबरोबरच व्याजदरात देखील सूट दिलेली नाही. उलट वसुलीच्या नावाखाली ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवून अन्याय चालवला आहे. हे वेळीच न थांबल्यास राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांनी आज (शनिवार) इचलकरंजीत पत्रकार परिषदेत दिला.

इचलकरंजीत शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वीज कनेक्शन खंडित केल्याच्या निषेधार्थ स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयाची तोडफोड केली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. यामुळे जयराज लांडगे यांनी सहका-यांसमवेत इचलकरंजी शहरात येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत महावितरणने अन्यायी कारवाई न थांबवल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा आणि उर्जामंत्री राऊत यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

या वेळी जिल्हा सचिव यतिन होरणे, नगरसेवक राजू दिंडोर्ले, मनसे तालुकाध्यक्ष, नगरसेवक दौलत पाटील वडगांव शहराध्यक्ष, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, मनोहर जोशी, मोहन मालवणकर, रामा बागलकोटे, उत्तम गोरे, विनायक मुसळे आदी उपस्थित होते.