मनसेचा पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा   

0
43

मुंबई (प्रतिनिधी) :  नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच. महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच,  अशा शब्दांत ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी  राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला,  असे विधान  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. यावर आता दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

दरम्यान, देशपांडे यांनी  १७ ऑगस्टच्या ट्विटमधूनही राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की,  राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.