कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करून जाब विचारण्यासाठी आज आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यालयाच्या दारातच आढावा बैठक घेतली. यावेळी अनेक तक्रारींचा तक्रारदारांनी पाढा वाचून प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, माजी आ. उल्हास पाटील यांनी, आबिटकरसाहेब, तुम्ही सत्तेत असल्यामुळे तुम्हाला मर्यादा आहेत, पण आम्हाला नाहीत. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला.

कोल्हापूर,सांगली,सातारा येथील प्राचार्य,प्राध्यापक,निवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या विविध तक्रारींचा पाढाच या आढावा बैठकीत वाचला. शिक्षक नेमणूक, प्रस्ताव मान्यता,अनुकंपा भरती,वैदयकीय बिले,निवृत्ती वेतन यासह अनेक शैक्षणिक बाबींच्या अंतिम मान्यतेसाठी शिक्षक सहसंचालक या कार्यालयात प्रस्ताव पाठविले जातात. पण रजिस्टर नोंद न करणे, कागदपत्रे गहाळ करणे, प्रस्ताव सादर न करणे, प्रलंबित ठेवणे यासह अनेक गंभीर तक्रारी या आढावा बैठकीत मांडल्या.

शिवाजी विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणारे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यासंदर्भातील अतिशय वेदनादायक व्यथा आज बैठकीत मांडल्या. यावेळी मेडिकल क्लेम, अनुकंपा भरती, पेन्शन मंजुरी, विद्यालयाचे ऑडीट या बाबतीत असलेल्या अनेक तक्रारीं कागदपत्रासह आम. आबिटकर यांच्या समोर सांगितल्या. यावेळी आम. आबिटकर यांनी प्रशासनाला धरले. येथील कर्मचार्यांची चौकशी करून दोषींना निलंबित केले जाईल असे सांगण्यात आले.

यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा अतिशय पोटतिडकीने मांडल्या. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी अतिशय तीव्र शब्दात खेद व्यक्त करून सहसंचालक कार्यालयातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना इशारा दिला. त्यांनी आमदार आबिटकर यांना सांगितले की, आमदारसाहेब तुम्ही सत्तेत असल्यामुळे तुम्हाला मर्यादा आहेत, पण आम्हाला नाहीत. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही दिला.