वारणानगर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व व्यवसाय तसेच सेवा क्षेत्र डबघाईला आलेले असताना औषधनिर्मिती आणि विक्री क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वारणा समूहाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे यांनी केले. तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी. एस्. सी. पदवीधर विद्यार्थ्यांसाठीच्या प्रशिक्षण शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या माध्यमातून बी. एस्. सी. पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शिबिर राबविण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याचे नमूद केले. डॉ. विनय कोरे म्हणाले की, जगात आपला देश औषध निर्मिती आणि विक्रीसाठी आकारमानाने चौथा तर व्यवसायासाठी जगात १३ व्या क्रमांकाचा देश आहे. भारतामध्ये उत्पादित होणारी औषधे इंग्लंड, अमेरिका  यासारख्या विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात याचा अभिमान आहे. मानवाच्या अस्तित्वापर्यंत औषधनिर्मिती आणि विक्री क्षेत्राला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार नसल्याचे समाधान व्यक्त केले.

या वेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरचिटणीस ॲड. राजेंद्र पाटील, शिबिरार्थी, सर्व प्राध्यापक, विद्यासेवक उपस्थित होते.