इचलकरंजी (प्रतिनिधी) : ‘आयजीएम’ रुग्णालयातील स्वच्छताप्रश्‍नी पुढाकार घेतला असून सातारा येथील रुबे अल केअर या संस्थेच्यावतीने प्रायोगिक तत्वावर मोफतपणे महिनाभर रुग्णालयातील स्वच्छता व साफसफाईसह रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. भविष्यातही रुग्णालयातील साफसफाई नियमित व्हावी यासाठी या संस्थेकडून प्रयत्न राहणार आहेत. मंगळवारपासून प्रत्यक्ष काम सुरु केले जाणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.

या प्रश्‍नी चार दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी व नगरपरिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतरही रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्‍न कायम राहिल्याने अखेर हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आ. आवाडे यांनी कसोशीने प्रयत्न सुरु केले आहेत.त्याच अनुषंगाने सातारा येथील रुबे अल केअर या संस्थेने आमदार आवाडे यांच्या आवाहनानुसार येथील आयजीएम रुग्णालयात एक महिन्यासाठी अगदी मोफत स्वच्छता व साफसफाईसह वैद्यकिय सेवेसाठी आवश्यक ती मदत पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.

याबाबतची माहिती देताना संस्थेचे सुनील सनबे यांनी सांगितले की, रुग्णालयासह आवारात स्वच्छता केली जाणार आहे. तसेच नर्स, वॉर्डबॉय, आया यांची सुविधा देण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्यही संस्थेकडूनच रुग्णांना चहा, नाश्ता, २ वेळचे जेवण देण्यात येणार आहे. सध्या या संस्थेकडून पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, सातारा येथील सिव्हील हॉस्पिटल, जंबो रुग्णालय आदी ठिकाणी ही सेवा पुरविली जात आहे.