कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली तर आमच्या ताराराणी विकास आघाडीच्या दोन्ही सदस्यांनी पाठिंबा देण्याबाबत विचार करू, मात्र अद्याप निश्चित असे ठरलेले नाही, असे आ. प्रकाश आवाडे यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्हा परिषदच्या पदाधिकारी निवडीला वेग आला असून येणाऱ्या आठवड्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून पदाधिकारी बदलाची जोरदार मागणी होत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आ. पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांनी दावा केल्यामुळे अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. जि.प. मध्ये वंदना मगदूम आणि राहुल आवाडे हे ताराराणी आघाडीचे दोन सदस्य आहेत. आमदार आवाडे यांनी राहुल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याचा मेसेज व्हायरल होऊ लागला. यामुळे एकमेकांशी फारसे सख्य नसलेल्या आवाडे आणि पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या.

या पार्श्वभूमीवर ‘लाईव्ह मराठी’ने थेट आ. प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी राहुल पाटील यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित आहे की नाही, याबद्दल आपल्याला कल्पना नाही. मात्र त्यांना उमेदवारी मिळाल्यास आमच्या आघाडी सदस्यांचा पाठिंबा देण्याचा विचार करू, अद्याप काहीही ठरलेले नाही, असे स्पष्ट केले.

आवाडे यांच्या या निर्णयामुळे दोन्ही नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत वाद मिटून सलोख्याचे संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. वास्तविक, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांच्याकडूनच जि. प. च्या पदाधिकारी निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. पण या वेळी राहुल पाटील यांना जि.प.चे अध्यक्षपद मिळणार की नाही याकडे मात्र जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.