इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिकेची आगामी निवडणूक ताराराणी पक्षातर्फे स्वबळावर लढविण्यात येतील, अशी घोषणा आ. प्रकाश आवाडे यांनी आज (शनिवार) ताराराणी आघाडीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केली. जो सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासह पक्ष संघटन बळकट करेल, त्यालाच पाठबळ दिले जाईल. तसेच ताराराणी पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणाही लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. आवाडे म्हणाले की, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठीच आम्ही येत असून आगामी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत आपलाच विजय निश्‍चित आहे. त्यासाठी सर्वच्या सर्व जागा ताराराणी पक्षातर्फे स्वबळावर लढविल्या जातील. सध्या नगरपालिकेत दोन महत्वाची खाती आपल्याकडे असून त्या माध्यमातून शहरातील सुविधांची वानवा दूर करुन नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा दिल्या जातील.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी सर्वांवरच आर्थिक अरिष्ट कोसळले. या लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलात १०० युनिटपर्यंत सवलत द्यावी, यंत्रमाग आणि लघुउद्योगांना 1 रुपयाची सवलत मिळावी यासाठी ताराराणी पक्षातर्फे सोमवार ८ फेब्रुवारी रोजी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ताराराणी पक्ष कार्यालयापासून सकाळी १० वाजता ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन कोल्हापूरकडे जाईल. त्याठिकाणी महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येईल. या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे वाहन देखील त्यांनी केले.

यावेळी ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, प्रकाश सातपुते, विलास गाताडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.