सातारा (प्रतिनिधी) : माण-खटाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांच्यासह चार जण त्या गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात गोरे यांच्यासह त्याचे सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत, तर त्यांच्या चालक आणि अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे.

आज पहाटे तीन वाजता सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली.

दरम्यान, आमदार गोरे यांच्यावर आता पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार गोरे यांच्या छातीला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल रुग्णालयातील न्यूरो ड्रॉमा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल  झिरपे यांनी दिली आहे.

गोरे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांनी भेटण्यासाठी रुग्णालयाबाहेर गर्दी करु नये असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी हॉल रुग्णालयात जाऊन आमदार गोरेंच्या तब्येतीची चौकशी केली.

डॉ. झिरपेंनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार गोरे यांना रुबी हॉल रुग्णालयाला सकाळी सात वाजता दाखल करण्यासाठी आणले जात आहे, असे कळवण्यात आले. सकाळी ७.४५ वा. ते रुग्णालयात पोहोचले. यावेळी डॉक्टरांच्या टीमने तातडीने त्यांची तपासणी केली. सुदैवाने आमदार जयकुमार गोरे यांना कोणताही गंभीर जखमी झाली नाही, ते शुध्दीवर आहेत, बोलत आहे. त्यांचे सर्व पल्स, बीपी व्यवस्थित आहे. त्यांना छातीला डाव्या साईडला मुकामार बसला आहे. त्यावर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. ते आऊट ऑफ डेंजर आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही, असे डॉ. झिपरे म्हणाले आहेत.