कागल (प्रतिनिधी) : कागल-सातारा या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण प्रस्तावित आहे. या कामातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लवकरच दिल्लीमध्ये भेटू, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. या संदर्भातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची व्यापक बैठक कागल विश्रामगृहात झाली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, कागल बसस्थानकाजवळच्या भुयारी पुलाचे रुंदीकरण, मुरगूडकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर उड्डाणपूल, तसेच लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपुलासह पंचतारांकित एमआयडीसीकडे जाणारा रस्ता सुरळीत झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास नेणार आहे.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर, सर्व्हेअर आर. डी. काटकर, सर्व्हेअर सोहम भंडारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पोवार, बाबासाहेब नाईक, संजय ठाणेकर, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, सतीश घाटगे, ॲड. संग्राम गुरव, संजय चितारी, विवेक लोटे, गंगाराम शेवडे, अर्जुन नाईक, संग्राम लाड आदी प्रमुख उपस्थित होते.

लवकरच नितीन गडकरींना भेटणार

आमदार मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे सापदरीकरण करताना रस्ता रुंदीकरण, ठिकठिकाणी उड्डाणपूल, विद्युतीकरण, पाणीपुरवठा पाईपलाईन, भूसंपादन, जमिनीचा मोबदला, तसेच नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीमध्ये भेटणार आहोत.