कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीलाच भाजपचा पाठिंबा असून भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे वेगळा विचार करणार नाहीत. असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिले.

‘गोकुळ’बाबत समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे मेळावा घेऊन आम्हाला कोणीही गृहीत धरू नये अशा भावना व्यक्त केल्या होत्या. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करताना सांगितले की समरजीत घाटगे यांचे ते स्वतंत्र मत नव्हते तर कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. पण जिल्ह्यात भाजपची ताकद आहे. ‘गोकुळ’मध्ये भाजपचे दोनशेच्यावर ठरावधारक मतदार आहेत. म्हणून सत्तारूढ आघाडीने भाजपला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, असा आमचा आग्रह आहे. तरीही भाजपचा संपूर्ण पाठिंबा महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीलाच राहणार असून या आघाडीला निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते परिश्रम घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.