संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा उभारणार : आ. चंद्रकांत जाधव

0
8

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी नाट्यगृहाच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारूया. त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया महानगरपालिकेने पूर्ण करावी व पुतळा उभारण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन आ. चंद्रकांत जाधव यांनी दिले. केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन आ. जाधव आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

नाट्यगृह परिसरात संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा उभारावा अशी मागणी विविध कलाकारांनी केली आहे. आ. जाधव म्हणाले की, केशवराव भोसले यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी  नाट्यगृहाच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारणे गरजेचे आहे. पुतळा उभारणीसाठी त्वरित समितीची स्थापना करावी व महानगरपालिकेने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.

केशवराव भोसले यांचे पणतू अशोक पाटील यांनी ऑक्टोबरमध्ये केशवरावांचे पुण्यशताब्दी वर्ष आहे. या निमित्त काही भरीव कामगिरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नाट्यपरिषदेचे आनंद कुलकर्णी यांनी केशवराव भोसले यांच्या नावानं महापालिकेनं पुरस्कार सुरु करावा, अशी मागणी केली.

या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिका कर्मचारी, कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.