कोल्हापुरातील तीन सबस्टेशनची उंची वाढवण्यासाठी निधी द्या : आ. चंद्रकांत जाधव

0
93

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या दुधाळी, नागाळा पार्क व बापट कॅम्प या कोल्हापुरातील तीन सबस्टेशनची उंची वाढवण्यासाठी ७.२१ कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आ. चंद्रकांत जाधव यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. त्यांनी आज (बुधवार) मंत्रालयात राऊत यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहराला वीजपुरवठा करण्यासाठी सोळा सबस्टेशन आहेत. यापैकी दुधाळी, नागाळा पार्क, बापट कॅम्प ही तीन सबस्टेशन जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुराच्या पाण्याखाली गेली होती. त्यामुळे सुमारे ७३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी मी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुरामुळे शहराचा वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना सहा महिन्यात करून घ्या अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या तीन सबस्टेशनची उंची वाढविणेसाठी ७.२१ कोटींचा प्रस्ताव महावितरणने तयार केला आहे. हा निधी त्वरित मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी मंत्री राऊत यांनी प्रस्ताव मंजूर करून निधी देण्याचे आश्वासन दिले.