कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करून अद्ययावत करावीत अशी मागणी आ. चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

आ. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे, हे अधोरेखीत झाले आहे. यासाठी सर्व जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय साहित्य व औषधांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने आरोग्य विभागामार्फत एक टास्क फोर्सची स्थापना करावी. या टास्क फोर्सचे सदस्य जिल्हा रुग्णालयांची पाहणी करून सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळावेत, या दृष्टीने आराखडा तयार करून आरोग्य विभागास सादर करतील. सरकारने या अहवालाचे परीक्षण करावे आणि रुग्णालयास सुसज्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करावा.