मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मितालीने बुधवारी दुपारी याची घोषणा केली आहे. मितालीने तिच्या २३  वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केले आहे. दरम्यान, ३९ वर्षीय या स्टार खेळाडूने कसोटी, एकदिवसीय, टी-२० या तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. लेडी सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरंच राहिले.

भारतीय संघाची धडाकेबाज फलंदाज मिताली राजने आज ट्विटरवर एक पत्र ट्वीट शेअर केले आहे. मितालीने लिहिले आहे की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले, तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता. गेली २३ वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.

मिताली राज ही महिला संघाची सर्वात यशस्वी क्रिकेटपटू होती. तिने १२ कसोटी सामन्यामध्ये ४३.६८ च्या सरासरीने ६९९ धावा केल्या आहेत. तिने भारताकडून २३२ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने ७८०५ धावा केल्या आहेत. यामध्ये ६४ अर्धशतक आणि ७ शतकांचा समावेश आहे. तसेच टी-२० मॅच फॉरमॅमध्ये तिच्या नावावर २३६४ धावा आहेत.