पुणे (प्रतिनिधी) : महिनाभरापूर्वी आपल्या चालकाकडे लिफाफ्यात सुसाईट नोट देऊन गायब झालेले उद्योजक गौतम पाषाणकर अखेर आज (मंगळवार) दुपारी राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमध्ये सुखरूप सापडले. ते कोल्हापूर येथे काहीजणांना दिसल्याने पोलिसांनी विविध हॉटेल, लॉजमध्ये चौकशी केली होती. ते मोठे उद्योजक असल्याने आणि त्यांच्या बेपत्तामागे राजकीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी व्यापकपणे तपास मोहीम राबवली. 

पाषाणकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठे नाव आहे. २१ ऑक्टोबरपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून ते बेपत्ता झाले होते. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी आपल्या चालकाकडे सुसाईड नोट लिहून ठेवली होती. व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख त्या नोटमध्ये करण्यात आला होता. परंतु, पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी आपल्या वडिलांच्या अपहरणामागे राजकीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला होता.

ते कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे समजले. पुणे पोलिसांनी कोल्हापुरात तपासणी केली असता ते तेथूनही गायब झाले होते. परंतु, ते त्या हॉटेलमध्ये वास्त्यवास असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. गुन्हे शाखेसह पुणे पोलिसांनी सहा पथके पाषाणकर यांच्या मागावर लावली होती. कोल्हापूर येथे पाषाणकर आढळल्याने ते सुखरूप असल्याचे पुणे पोलिसांची खात्री पटली होती. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांचा ठावठिकाण्याबाबत निश्चित माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना जयपूर येथील एका हॉटेलमधून दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आले.