कोल्हापूर (प्रतिनिधी) :  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्तारूढ गटाने आपल्या नातेवाईकांना बँकेत नोकरीला लावण्याच्या उद्देशाने पैशाची उधळपट्टी केली आहे. असा आरोप विरोधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केली.

अर्जुन पाटील म्हणाले की, गतवर्षी ७०९८ सभासद होते. या आर्थिक मालामध्ये ६९७१ सभासद आहेत. सध्या शिक्षक बँकेमध्ये ११९ कर्मचारी काम करीत आहेत. याकडे बारकाईने पाहिल्यास ५८ सभासदांसाठी एक कर्मचारी काम करत आहे. संचालक मंडळ नेहमी सांगत आहे की, कर्मचारी भरल्याने बँकेवरती कोणताही आर्थिक भार पडलेला नाही. पण  गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २०११ साली कर्मचाऱ्यांचा पगार ५ कोटी ५३ लाख झाला. २०२० साली ६ कोटी ४० लाख खर्च झाला आहे. तर २०२०-२०२१ साली ७ कोटी १० लाख इतका नोकर पगारावर खर्च झाला आहे.

तसेच शाखावार विचार केल्यास गडहिंग्लजचा नफा १० लाख आहे. सहा सेवक काम करतात आणि ३६ लाख पगारावर खर्च केला आहे. मुरगुडचा नफा ६ लाख ५० हजार झाला आहे. सेवक ८ सेवकांवर ४८ लाख पगारावर खर्च झाला आहे. भुदरगड नफा १२ लाख ४५ हजार, सेवक ११ आहेत. पगारावर खर्च ६६ लाख झाला आहे. आज नफा ७ लाख ५२ हजार कर्मचारी आहेत पगारावर ३६ लाख खर्च झाला आहे. वारणा शाखेचा ७ लाख ८६ हजार नफा, सेवक ८, पगारावरती खर्च ४८ लाख होतात.

याशिवाय संगणकावरती २३ लाख ९४ हजार इतका खर्च झाला असून प्रत्येक संगणका पाठीमागे २४ हजार इतका मैटनेन्स टाकण्यात आला आहे. यामध्ये लीजलाईन खर्च ७ लाख २५ हजार अधिक धरला असता प्रत्येक संगणका पाठीमागे 31 हजार २३१ रूपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. अत्यल्प वापर असलेल्या एटीएमवर ६ लाख रूपये खर्च केला आहे. सभासदांचा विचार न करता संचालकांनी आपला फायदा पाहून कारभार केलेला आहे. बँक ही सभासदांसाठी आहे की संचालक मंडळासाठी आहे. हा मोठा प्रश्न जनरल सभेच्या निमित्ताने समोर येत आहे. ही जी उधळपट्टी झाली आहे ती फक्त आणि फक्त आपले नातेवाईक बँकेत नोकरीला लावण्याच्या उद्देशाने केली असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला सरचिटणीस प्रमोद तौदकर,  शरद केनवडे, वर्षाताई केनवडे, दीपाली भोईटे, प्रमोद भांदिगरे, विष्णू जाधव आदी उपस्थित होते.